पुणे – अजित गाडगीळ यांनी कलेचं व्यासपीठ निर्माण करून मोठं काम केलं आहे व यात जागतिक शिक्षणाचे केंद्र बनण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन पंडित हरिप्रसाद चौरसिया जी यांनी केल.
पीएनजी सन्सचे अध्यक्ष अजित गाडगीळ यांनी पुण्यात खडकवासलाजवळ कुडजे येथे स्थापन केलेल्या झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयाचे उद्घाटन चौरसिया जी, अरुणा ढेरे, मनीषा साठे, सुभाष अवचट, सुधीर पटवर्धन यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
या वेळी अजित गाडगीळ, डॉ. रेणू गाडगीळ, पीएनजी सन्सचे संचालक – सीईओ अमित मोडक, राजू सुतार, पं. वसंतराव गाडगीळ, नाना पाटेकर, शिरीष बेरी, राहुल देशपांडे, विजय घाटे, सतीश कुबेर, श्रीकांत कुबेर, सुनील पाठक, नंदू देवळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
चौरसिया जी म्हणाले, “मला आजपर्यंत जो सन्मान मिळाला आहे तो या महाराष्ट्रामुळे मिळालेला आहे आणि तो का मिळाला आहे, हे आजच्या या कार्यक्रमामुळे मला समजले. हे राज्य महान का आहे, हे नावातूनच स्पष्ट होते.”
ते म्हणाले, “कला शिक्षणासाठी झपूर्झा हे भारतच नाही तर विश्वासाठी शिक्षणाचे केंद्र बनेल. लोकांना पैसे सांभाळणे अवघड जाते. पण, गाडगीळांनी विविध चित्र, कला एका ठिकाणी गोळा करून फार मोठे योगदान दिले आहे.”