पुणे – वर्ल्ड फोटोग्राफी डे अर्थात 19 ऑगस्टनिमित्त पीएनजी सन्स आर्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत पुण्यात झपूर्झा येथे व्हिंटेज कॅमेरांचे प्रदर्शन होत आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वीपासून ते आधुनिक काळातील विविध कॅमेरे एकाच छताखाली पाहता येणार आहेत.
फ्रान्सने फोटोग्राफीचे डॅगरोटाइप प्रोसेस पेटंट 19 ऑगस्ट 1839 रोजी विकत घेऊन सर्वांसाठी खुले केले. त्यामुळे जगाला फोटोग्राफी खुली झाली. त्यामुळेच 19 ऑगस्ट हा वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणून साजरा होतो. या दिवसाचे औचित्य साधून पीएनजी सन्स व झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयाने व्हिंटेज कॅमेऱ्यांचे प्रदर्शन 19 व 20 ऑगस्ट रोजी एनडीए पीकॉक बेजवळील कुडजेतील झपूर्झा येथे भरविले आहे.
प्रदर्शनात 1934 पासूनचे विविध काळातील व विविध तंत्रज्ञानाचे तत्कालीन काळानुसार आधुनिक असणारे कॅमेरे पाहता येतील. त्याचबरोबर कॅमेऱ्याच्या विविध काळातील जाहिराती येथे लावण्यात आल्या आहेत. तसेच, कॅमेऱ्यामुळे फोटोग्राफीचा झालेला प्रवास येथे मांडला आहे.
झपूर्झा येथे गॅलरी क्रमांक 10 मधील कॅमेरा प्रदर्शनाबरोबर सर्वेश राजपाठक, केदारनाथ भागवत, स्वाती गावडे व शेखर डेरे यांनी नॉर्दन लाइट्स-आइस लँड, निसर्ग, शिल्प, हिमालय पर्वत रांग आदी विषयांवर काढलेले फोटो आर्ट प्लाझा येथे ठेवण्यात आले आहेत. आर्ट प्लाझा येथे स्वप्निल कुमावत यांनी काढलेले अबस्ट्रॅक व दार यांवर काढलेल्या फोटोग्राफचे प्रदर्शन होत आहे.