प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 13 -“झपुर्झा’ कला व संस्कृती संग्रहालय हे प्रत्येक व्यक्तीने भेट द्यावे असे ठिकाण आहे. तसेच महाराष्ट्रात राहत असल्याचा सार्थ अभिमान वाटेल असेच आहे, असे प्रतिपादन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
अजित गाडगीळ व डॉ. रेणू गाडगीळ यांनी कुडजे (एनडीए पीकॉक बे, खडकवासला) येथे उभारलेल्या “झपुर्झा’ कला व संस्कृती संग्रहालयास सुळे यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी डॉ. रेणू गाडगीळ, पीएनजी सन्सचे संचालक-सीईओ अमित मोडक, म्युझियमचे प्रमुख सुनील पाठक, नंदू देवळे, म्युझियम क्युरेटर राजू सुतार आदी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, “आपला भारत महान आहे, अशा देशात, महाराष्ट्रात राहण्याचा सार्थ अभिमान तुम्हाला इथे आल्यावर वाटेल. गाडगीळ कुटुंबाने खूप आगळा-वेगळा असा हा उपक्रम देशाला उपलब्ध करून दिला आहे, ही उल्लेखनीय बाब आहे.
दरम्यान, “पुण्यापासून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर असणार हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे. येथे अनेक गोष्टींचा बारकाईने विचार करण्यात आला असून, म्युझियमचे उत्तम गाइड्स येथे आहेत. लहानमुले व मोठ्यांना पाहण्यासाठी व करण्यासाठी बरेच काही येथे आहे. “झपुर्झा’ येथे पुरातन वस्तू, दागिने, वस्त्रे अन् नावाजलेल्या कलाकारांच्या मूळ कलाकृती येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच, लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा येथे भरविल्या जातात,’ असे सुनील पाठक यांनी सांगितले.