श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल
श्रीगोंदा – श्रीगोंदे शहरात मैत्रिणीसोबत क्लासला जात असताना एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे भरदिवसा सिनेस्टाईलने अपहरण झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
सतरा वर्षीय विद्यार्थिनी मैत्रीणीसोबत शहरातील दौंड रस्त्याने क्लासला जात होती. या दरम्यान पाठीमागून एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली. या गाडीतील एकाने खाली उतरून विद्यार्थिनीला बळजबरीने गाडीत बसविले. हा प्रकार अचानक घडल्याने तिच्यासोबत असणाऱ्या मैत्रिणीसह विद्यार्थिनीने आरडाओरडा केला. मात्र बाजूच्या नागरिकांना काही समजण्याच्या आतच ती पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ वेगात कर्जतच्या दिशेने निघून गेली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत श्रीगोंदे शहरातून जाणाऱ्या सर्व रस्त्यावर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. भरदिवसा विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याने महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पालनकर्त्याच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी राजेंद्र रतन आरु व एक अनोळखी इसम (रा.कोकणगांव ता.श्रीगोंदा) यांच्यावर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.