ढासळलेल्या फुलांच्या बाजार भावाला शीतगृहाचा आधार

पुरंदरचा शेतकरी होतोय हायटेक : फुलशेतीला आले चांगले दिवस

भुलेश्‍वर – पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचा फुलशेती हा सध्या महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो. कारण शेतीच्या माध्यमातून सण उत्सवामध्ये चांगले पैसे मिळत असल्यामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक शेतकरी याकडे वळले आहेत. फुलशेतीला जरी गणपती पावला असला तरी पितृ पंधरवड्याला मात्र संक्रांत आली होती.

बाजारभाव कोसळल्यामुळे असल्याने मातीमोल भावात फुले विकावे लागली होती. त्यामुळे माळशिरसच्या शेतकऱ्यांनी कमी बाजारभावात फुलांची विक्री न करता शितगृहामध्ये फुलांची साठवण करुन ठेवली आहे.

माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार सोमनाथ जगदाळे यांच्या शेतात पेपर व्हाईट, भाग्यश्री, पिवळे, पांढरे, सेंट व्हाईट, पौर्णिमा, कोईमतुर सामंती इत्यादी प्रकारची फुले लावली आहेत. या फुलांना गणपती उत्सवात चांगला बाजारभाव मिळाला होता. मात्र, पितृपंधरावड्यात फुलांचे भाव कोसळल्यामुळे काहीवेळा तर फेकून देण्याची वेळ आली होती. यामुळे फूल उत्पादकाचे कंबरडे मोडले होते. मात्र, निराश न होता सोमनाथ जगदाळे व नितीन जगदाळे यांनी पंचवीस हजार रुपये महिना दराने शितगृह आणले आहे. त्यामुळे आता दररोज फुलांची तोडणी करुन त्यामध्ये साठवणूक केली जात आहे.

सध्या यात दोन टन मालाची साठवणूक केली आहे. ही फुले नवरात्री उत्सव व दसरा या कालावधीत बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्यात येणार आहेत. यामुळे फेकून व कमी बाजारभावाच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने फुलशेती अधिक उत्पन्न देणारी आहे. उत्सव काळात तर जादा बाजारभाव मिळतो. मात्र, पितृपंधरावड्यात बाजारभाव कोसळतात. फुलांचे नुकसान होऊ नये म्हणून शितगृहाचा उत्तम पर्याय आहे.
– सोमनाथ जगदाळे, प्रगतशील शेतकरी

Leave A Reply

Your email address will not be published.