फलटण – आमच्या हातून जनतेच्या कल्याणाची कामे व्हावीत, असा आशीर्वाद श्रीरामाने द्यावा. येथून पुढे फलटणला आल्यावर श्रीरामाचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फलटण येथील ऐतिहासिक मंदिरात दर्शन घेऊन फडणवीस यांनी श्रीरामाची आरती केली.
विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर, फलटण बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बबन शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, रामराजेंच्या निमंत्रणावरून या ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिरात आल्यावर, येथील प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या सुंदर मूर्ती पाहून आनंद झाला. तब्बल 500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येतील मंदिरात श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना दि. 22 रोजी होत आहे. या काळात फलटण येथे श्रीरामाचे दर्शन घ्यायला मिळाले, ही बाब विशेष आहे.