सातारा – साताऱ्यातील ऑन्को – लाइफ कॅन्सर सेंटरमधील डॉक्टरांच्या यशस्वी उपचारांमुळे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीने कर्करोगावर मात केली. साताऱ्यातील तीन वर्षीय प्रीतीला (नाव बदलले आहे) हेपॅटोब्लास्टोमाचे निदान झाले. हा यकृत कर्करोगाचा एक प्रकार आहे. डॉ. सिद्धेश त्र्यंबके (रेडिएशन व मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट) आणि डॉ. रवी वाटेगावकर (वरिष्ठ सल्लागार वैद्यकीय कर्करोग तज्ज्ञ)यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत टीमने या चिमुकलीवर यशस्वी उपचार केले. तिच्यावर केमोथेरपी करण्यात आली. ज्यामध्ये 4 चक्रांचा समावेश होता. जिचे प्रत्येक चक्र 5 दिवसांपेक्षा जास्त काळ चालले आणि 3 आठवड्यातून एकदा पुनरावृत्ती केली गेली. केमोथेरपी दरम्यान अनेकदा गुंतागुंत निर्माण झाली. या साऱ्यांचे डॉक्टरांच्या टीमने प्रभावीपणे व्यवस्थापन केले. प्रीतिची काळजी तिच्या परिवारासोबतच हॉस्पिटलचे कर्मचारी व व्यवस्थापकीय वर्गाने घेतली. तिला भरपूर प्रेम दिले.
केमोथेरपी पूर्ण झाल्यानंतर प्रीतिला डॉ. त्र्यंबके यांनी पेट-सीटीची तपासणी करण्याचा सल्ला दिला. या चिमुकलीने उपचारांना पूर्ण सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रूग्णालयात अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया होती. ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष उदय देशमुख आणि कार्यकारी संचालक सचिन देशमुख यांनी तिला जीवनदान देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, विविध माध्यमांतून तिच्या शस्त्रक्रियेसाठी निधी गोळा करण्यात मोलाची भूमिका निभावली.
वरिष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मनोज लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने कोणत्याही अनुचित गुंतागुंतीशिवाय यकृतातील सर्व जोखमीचा भाग यशस्वीपणे काढून टाकला. तिला शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले, तेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिचा वाढदिवसही उत्साहात साजरा केला. प्रितिला आता घरी सोडण्यात आले आहे. ती प्रदीर्घ उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेली सर्वात कमी वयाची पहिली रुग्ण असून तिथल्या सर्व कॅन्सर रुग्णासाठी ती एक प्रेरणा बनली आहे, असे डॉ. सिद्धेश त्र्यंबके यांनी स्पष्ट केले.