नवी दिल्ली – पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने 92 जागा जिंकत मोठा विजय मिळविला आहे. पंजाबमधील या विजयाचा “आप’ला राज्यसभेत मोठा फायदा होणार आहे. पंजाबमधील या एकतर्फी विजयामुळे आपचे राज्यसभेतील खासदारांची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे या महिन्याच्या अखेरीस पंजाबमधील राज्यसभेच्या पाच खासदारांसाठी निवडणूक होणार आहे. या पाच जागांवर त्यांना आपले उमेदवार सहजपणे विजयी करता येणार आहे.
“आप’ने पंजाब निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेससह अकाली दल आणि भाजपला धोबीपछाड दिला. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, उपमुख्यमंत्री, पंजाब कॉंग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू अशा दिग्गजांना पराभवाचा धक्का दिला आहे.
याशिवाय कॅप्टन अमरिंदर आणि सुखबीरसिंग बादल यांचाही पराभव झाला. पंजाबमधील या निवडणूक विजयाचा आप पक्षाला राज्यसभेतही मोठा फायदा होणार आहे. येत्या 31 मार्च रोजी पंजाबमधून राज्यसभेच्या खासदारांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. “आप’कडे असलेले बहुमत पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेत एकूण सात जागा पंजाबमधून निवडल्या जातात. त्यातील पाच जागांसाठी 31 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
सध्या राज्यसभेत आपचे तीन खासदार आहेत. पंजाबमधील 5 खासदारांची निवड झाल्यानंतर ही संख्या आठ होणार असल्याने राज्यसभेत “आप’चे बळ वाढणार आहे.