बैरूत – दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (इसीस)ने पहिल्यांदाच त्यांचा प्रमुख अबू इब्राहिम अल-हाशमी मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इसीसने प्रथमच मान्य केले की, गेल्या महिन्यात उत्तर-पश्चिम सीरियामध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांचा प्रमुख नेता मारला गेला होता. इसीसचा नेता अबू इब्राहिम अल-हाशमी अल-कुरैशीबद्दल पहिल्यांदा अधिकृत प्रतिक्रीया दिली आहे. त्यानंतर आता इसीसने आपला नवीन म्होरक्या निवडला आहे.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुर्कीच्या सीमेजवळील उत्तर-पश्चिम सीरियातील अटमेह शहरात अमेरिकेने 3 फेब्रुवारी रोजी अबू इब्राहिम अल-हाशमी अल-कुरैशीच्या लपण्याच्या जागेवर हल्ला केला होता, तेव्हा कुरैशीने कुटुंबातील सदस्यांसह स्वत:ला बॉम्बने उडवले.
यावर इसीसचे प्रवक्ते अबू ओमर अल-मुहाजेर यांनी एका ऑडिओ संदेशात म्हटले की, इसीसचा नेता तसेच या गटाचा माजी प्रवक्ता अबू हमजा अल-कुरैशीचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. आता अबू अल-हसन अल-हाशमी अल-कुरैशी याची नवीन नेता म्हणून निवड करण्यात आली आहे.
अबू बकर अल-बगदादीच्या मृत्यूनंतर अबू इब्राहिम अल-हाशमी अल-कुरैशी 2019 मध्ये इसीसचा प्रमुख बनला होता. यानंतर अबू इब्राहिम अल-हाशमी अल-कुरेशी गेल्या महिन्यात उत्तर-पश्चिम सीरियामध्ये अमेरिकन सैन्याने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत मारला गेला होता. मात्र, इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून याबाबत कोणतेही दुजोरा मिळाला नाही.