नवी दिल्ली – दिल्लीत काल विधानसभा निवडणुकीची मजमोजणी झाल्यानंतर तेथे विजयी झालेले आम आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव हे मंगळवारी रात्री मिरवणूक संपवून आपल्या घराकडे जात असताना त्यांच्या मोटारीच्या ताफ्यावर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केला. त्यात एक आप कार्यकर्ता ठार झाला असून आणखी एक जण जखमी झाला आहे.
आपल्या मतदार संघातील मंदिरात विजयानंतर दर्शन घेण्यासाठी आमदार नरेश यादव हे गेले होते तेथून ते परतत असताना हा प्रकार झाला आहे. गोळीबारात ठार झालेल्या कार्यकर्त्याचे नाव अशोक मान असे असल्याचे संजयसिंह यांनी म्हटले आहे. मेहरौली भागात त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रकार घडला आहे. आम आदमी पक्षाच्याच आमदारालाच ठार मारण्याचा हल्लेखोरांचा प्लॅन होता असा आरोप आपच्या सोशल मिडीया सेलचे प्रमुख अंकित लाल यांनी केला आहे.