“वंचित’ आणि ‘आप’चा करवीरसाठी एकच उमेदवार
कोल्हापूर (प्रतिनिधी) – तिकिटासाठी केवढी मारामार चालते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु, जिथे एक तिकीट मिळायला कठीण तिथे एकाच उमेदवाराला एकाच विधानसभा मतदारसंघासाठी दोन-दोन पक्षांकडून उमेदवारी जाहीर ली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातून डॉ. आनंद गुरव यांना आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी उमेदवारी जाहिर केली आहे.
काल आपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत डॉ. आनंद गुरव यांचे नाव होते आणि आज वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतही त्यांचे नाव आहे. करवीर विधानसभा मतदारसंघासाठी त्यांचे नाव दोन्ही पक्षांनी फायनल केले आहे, यावर आता डॉ. आनंद गुरव काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 22 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवार यादी जाहीर करताना वंचित आघाडीने नावासमोर उमेदवारांची जातही लिहिली आहे.
वंचित आघाडीने कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघातून आनंद गुरव यांना उमेदवारी दिली. मात्र आनंद गुरव हेच नाव काल (23 सप्टेंबर) “आप’च्या यादीतही होतं. आपने विधानसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवार जाहीर केले. यामध्येही करवीर विधानसभा मतदारसंघातून आनंद गुरव यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे माणूस एक आणि उमेदवारी दोन पक्षातून, असं चित्र पाहायला मिळत आहे.
वंचितने दिले स्पष्टीकरण
आनंद गुरव यांच्या दुहेरी उमेदवारीवर वंचितकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याप्रमाणे वंचित आणि आपमध्ये निवडणुकीतील युतीबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे आपनेही त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र, स्वतः आनंद गुरव यांनी आपण वंचित बहुजन आघाडीच्या फॉर्मवर निवडणूक लढवणार असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
आनंद गुरव नॉट रिस्पॉंडिंग
आप आणि वंचितच्या उमेदवारीबाबत आनंद गुरव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा फोन बंद आला. त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे हे अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे. मात्र, युतीच्या आधीच उमेदवारांच्या मुद्द्यावर वंचित आणि आपमध्ये स्पर्धा सुरु झाल्याची चर्चा आहे.