Aadhar-Pan Card Link: पॅन कार्ड क्रमांक आधारसोबत लिंक जोडणे सरकारकडून अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी सरकार कडून मुदत देण्यात आली होती. मात्र आता ती संपल्याने ज्या लोकांनी पॅन कार्ड क्रमांक आधारसोबत लिंक केलेला नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र तरीही देशातील तब्बल 11 कोटींहून अधिक पॅनकार्डधारकांनी पॅन आणि आधार एकमेकांशी जोडलेलं नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने संसदेत ही आकडेवारी जाहीर केली आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) लोकसभेत लेखी उत्तरात याबद्दल माहिती दिली. 29 जानेवारी 2024 पर्यंत देशभरातल्या 11.48 कोटी पॅनकार्ड धारक आपलं पॅन आधारला जोडण्यात अयशस्वी ठरले आहेत. एक जुलै 2017पूर्वी जारी केलेली पॅन कार्ड्स आधारशी जोडणं केंद्र सरकारने अनिवार्य केलं होतं. त्यासाठी सरकारने 30 जून 2023 रोजीची अंतिम मुदत दिली होती. त्या दिवसापर्यंत आधार-पॅन लिंक न करणाऱ्यांचं पॅन कार्ड निष्क्रीय करण्यात आलं आणि दंड भरल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आलं.
आतापर्यंत 60 लाखांहून अधिक नागरिकांनी आधार-पॅन लिंक न केल्याबद्दलचा दंड भरला आहे. त्या माध्यमातून सरकारकडे 601.97 कोटी रुपये महसूल गोळा झाला आहे. एक जुलै 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत हा दंड गोळा करण्यात आला आहे. दंडाविना आधार-पॅन लिंकिंगसाठी सरकारने 30 जून 2023 ही मुदत दिली होती. त्या मुदतीनंतर लिंक करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागत आहे, अशी माहिती संसदेत वित्त राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी दिली.
पॅन-आधार लिंक कसे करावे?
1. पॅन आधारला लिंक करण्यासाठी https://incometaxindiaefiling.gov.in या इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर जावे.
2. या वेबसाइटवर रजिस्टर करावं. रजिस्ट्रेशननंतर पॅन नंबर हा युझर आयडी होईल.
3. नंतर युझर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉगिन करावं.
4. त्यानंतर एक पॉप अप विंडो येईल. त्यात पॅनला आधारशी लिंक केलं जाईल. प्रोफाइल सेटिंगमध्ये जाऊनही ‘लिंक आधार’वरही क्लिक करू शकता.
5. डेट ऑफ बर्थ आणि जेंडर डिटेल्स द्या.
6. तुमचे सर्व डिटेल्स पडताळा आणि ‘लिंक नाऊ’वर क्लिक करा.
7. त्यानंतर 1000 रुपये दंड देऊन पॅन आणि आधार लिंक करू शकता.
8. पॅन आधार लिंक झाल्यावर मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडीवर मेसेज येईल.