सातारा – गेल्या चोवीस तासात सातारा शहरात दोन दहशतीच्या घटना घडल्याने शांतता प्रिय पेन्शनर सिटी हादरली आहे. कोयता गॅंगच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर काही तासातच वाढे फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री एक वाजता गोळीबार झाला. शुक्रवार पेठ येथील अमित भोसले (वय 38 रा शुक्रवार पेठ, सातारा) हा युवक या हल्ल्यात ठार झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या घटनांची गंभीर दखल घेतली असून तपास यंत्रणा ऍक्शन मोडवर आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील महामार्गावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. भोसले हे रात्री जेवण करण्यासाठी वाढे फाटा परिसरातील हॉटेलमध्ये गेले होते त्यानंतर ते त्यांच्या गाडीत असताना दुचाकी वरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. भोसले हे तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले गोळीबार झाल्याच्या थरारनंतर परिसरात खळबळ उडाली. वाढे फाट्यानजीक पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यावसाय चालतो. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
शाहूपुरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला आहे . भोसले यांच्या समवेत असणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याकडे करून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे . तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी या संदर्भात अधिक माहिती दिली नाही. आधी कोयता गॅंगची दहशत नंतर वाढे फाटा परिसरात गोळीबार यामुळे पोलीस अधीक्षक समीर शेख या वाढत्या दहशती कारवाया कशा रोखणार हे पाहणे महत्वाचे आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या गोळीबारामुळे हॉटेल व्यावसायिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण आहे. सदरचा मृत्यू झालेले भोसले सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील गॅरेज व्यावसायिक असून, त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्याठिकाणी त्याच्या कुटुंबियांनी, मित्रांनी धाव घेतली आहे. सातारा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.