सातारा – भाजपच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या वाढे गावातील बंगल्याच्या परिसरात पुरून ठेवलेल्या महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सातारा तालुका पोलिसांची बेड्या ठोकल्या असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. विकास हिरामण सकट (वय 38, रा. कलेढोण ता. खटाव, सध्या रा. फुलेनगर ता. वाई) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 4 जानेवारी रोजी सातारा तालुका पोलिसांना वाढेगावच्या हद्दीत माजी आमदार कांता नलावडे यांच्या बंगल्याच्या पाठीमागे अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची पोलिसांनी कौशल्याने तपास करून ओळख पटवली होती. मंगल शिवाजी शिंदे (वय 50 रा. संगम माहुली) असे त्या महिलेचे नाव होते.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी विशेष पथक तयार करून तपासाला सुरु ठेवला होता. सदरचा आरोपी मोबाईल वापरत नसल्यामुळे पोलिसांच्या हातात येत नव्हता. वेगवेगळ्या पथकाद्वारे पुणे, मुंबई तसेच लगतच्या जिल्ह्यामध्ये सातारा पोलिसांनी जोरदार तपास केला. दि. 23 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना सदर आरोपी हा पुण्यामध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाली. घोडके यांनी पोलिसांचे एक पथक तात्काळ पुण्याला रवाना करून आरोपीला पुण्यात अटक केली. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, हवालदार संदीप आवळे, निलेश जाधव, मालोजी चव्हाण, नितीराज थोरात, राहुल राऊत, सचिन पिसाळ गिरीश रेड्डी यांनी सहभाग घेतला. या कारवाईबद्दल सातारा तालुका पोलिसांचे अधीक्षक समीर शेख यांनी स्वागत केले आहे.