- आण्णा बोदडेंना करोनाची लागण
- मोशीतील क्वारंटाइन सेंटर सील
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त आण्णा बोदडे यांना करोनाची लागण होताच मोशीतील क्वारंटाइन सेंटरच सील करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे क्वारंटाइन सेंटर सील केल्यामुळे पालिकेच्या बेजबाबदार अजब कारभाराचा गजब नमुना सर्वांसमोर आला आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये नसलेला संवाद आणि पर्यायी व्यवस्था या संपूर्ण प्रकाराला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहामध्ये क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आले आहे. या क्वारंटाइन सेंटरची जबाबदारी महापालिकेचे सहायक आयुक्त आण्णा बोदडे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात बोदडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे क्वारंटाइन सेंटरच सील करण्यात आले आहे.
या ठिकाणी विलगीकरण करण्यात आलेल्या सर्वच्या सर्व नागरिकांना थेट घरी सोडण्यात आले आहे. वस्तुत: हे सेंटर महापालिकेने उभारले आहे. एखाद्या अधिकाऱ्याला लागण झाल्यानंतर संपूर्ण यंत्रणाच बंद करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
करोनासंदर्भात आमचे अत्यंत सूक्ष्म नियोजन असल्याचा आयुक्तांनी केलेला दावाही यामुळे फोल ठरला आहे. बोदडे यांच्याऐवजी पर्यायी अधिकाऱ्याकडे या क्वारंटाइन सेंटरचे नियोजन सोपविण्याऐवजी ते थेट बंद करण्याचा प्रकार म्हणजे पालिकेच्या नियोजनाचे दिवाळे निघाल्याचे बोलले जात आहे. तर पालिकेचे नियोजन किती बेजबाबदारपणाचे आहे ते देखील याप्रकारानंतर समोर आले आहे.