मुस्लीम दाम्पत्याकडून सत्यनारायण महापूजा : बाराबलुतेदारांना मान
केतकावळे- पुरंदर तालुक्यातील सासवड-हडपसर रस्त्यावर दिवे घाटानजीक असलेले दिवे गाव प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गाव म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. ग्रामदैवत श्री कातोबा मंदिरात अधिक मासातील पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे ग्रामदेवतेचा अभिषेक आणि श्री सत्यनारायणाची महापूजा एका मुस्लीम दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. गावाने हिंदू-मुस्लीम सामाजिक ऐक्य इतर गावांना दाखवून दिले आहे.
दिवे गावात प्रत्येक पौर्णिमा गावच्या वतीने साजरी करण्यात येते. यानिमित्त देवाची महापूजा, अभिषेक करून देवाला नवीन पोशाख तसेच सायंकाळी महाप्रसाद आणि संगीत भजन आदी कार्यक्रम पार पडतात. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अर्थात अधिक महिन्यातील पौर्णिमेला महापूजा करण्याचा मान वर्षानुवर्षे गावच्या बारा बलुतेदारांना देण्यात आला आहे. गुरुवार (दि.1) बारा बलुतेदारांच्या वतीने मुस्लीम समाजातील सोहेल मुलाणी आणि तानिया मुलाणी या नवदाम्पत्याच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. यावेळी ग्रामदैवतास अभिषेक घालून सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. देवाला नैवद्य देवून उपस्थित भाविकांना प्रसाद देण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच रुपाली झेंडे, ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत शीतकल, दस्तगीर मुलाणी, नजीन भाई मुलाणी, मंदिराचे पुजारी दिगंबर दिवेकर, गणेश दिवेकर, रेखा झेंडे, पूनम झेंडे, बारा बलुतेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.