मुंढवा, दि. 7 (प्रतिनिधी) – केशवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य चौकात पिंपळाचे झाड उन्मळून चारचाकीवर कोसळले. ही घटना सायंकाळी 4 च्या सुमारास श्री गजानन महाराज मंदिरासमोर घडली. या वाहनातील कुटुंबाला दुखापत झाली नाही. परंतु या गाडीचे मोठे नुकसान झाले.
मुंढव्याहून केशवनगरला जाताना ओढा आहे. याच पुलावरील मुख्य रस्त्यापुढील चौक कायम गजबजलेला असतो. येथे हा जुना पिंपळवृक्ष होता. दरम्यान, रविवारी हे झाड उन्मळून एम.एच.12-जी.एफ.5598 या चारचाकी वाहनावर कोसळले. या गाडीत मनोज देशमाने, त्यांची पत्नी व चार वर्षांचा मुलगा हे प्रवास करत होते. नशीब बलवत्तर म्हणून हे झाड गाडीच्या बोनेटवर पडले.
दरम्यान, ही घटना समजताच माजी नगरसेविका पूजा कोद्रे, समीर कोद्रे, भोलेनाथ मित्र मंडळाचे कार्यकर्ते व येथील तरुण कार्यकर्ते यांनी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला संपर्क साधला. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनतर झाड कटरच्या सहाय्याने तोडून बाजूला करण्यात आले.
यादरम्यान येथील चौकात तसेच मुंढवा महात्मा फुले चौक, मुंढवा गावठाण, लोणकर विद्यालय परिसरातील मुख्य रस्त्यावर दोन-तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.
आज केशवनगरकरांना पालिकेच्या ढिसाळ कारभाराची पुन्हा प्रचिती आली. मुंढवा-केशवनगरमधील समस्यांकडे लक्ष द्या, अशी मागणी वारंवार करतो आहोत. आज एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. प्रशासन आता तरी लक्ष देईल का?
– पूजा कोद्रे, माजी नगरसेविका
होर्डिंग दिसत नसल्याने पालवी फुटलेल्या झाडावर विषप्रयोग झाल्याची चर्चा
हे पिंपळाचे झाड गेल्या तीन-चार वर्षांपासून वाळले होते. पण, त्याला 4 महिन्यांपूर्वी तुरळक पालवी फुटली होती. रस्त्याच्या मधोमध वृक्ष असल्याने त्यावर विषप्रयोग झाल्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. या झाडामुळे फ्लेक्स दिसण्यास अडचणी असल्याने काही चमको लोकांनी हे कृत्य केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. या झाडावर कावळ्यांची चार घरटी देखील होती. फ्लेक्स संस्कृती टिकविण्यासाठी पर्यावरणाची हानी होत असल्याने या झाडांच्या फांद्याची कायम छाटणी केल्याचे नागरिक सांगत आहेत. या परिसरात होर्डिंगसाठी अनेक झाडांची कत्तल केली जात आहे.