नवी दिल्ली : कोरोनोच्या बाधेमुळे परदेशात 276 भारतीय बाधीत झाले आहेत. इराणमध्ये 255, अमेरिकेत 12, इटलीत 5 आणि हॉंगकॉंग, कुवेत, रवांडा तसेच श्रीलंकेत प्रत्येकी एका भारतीयाला कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयंकर यांनी लोकसभेत दिली.
भारतातून गेलेल्या पथकाने इराणमध्ये केलेल्या तपासणीत 254 यात्रेकरूंना बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या देशात अडकलेल्या नागरीकांच्या चाचणीसाठी तात्पुरती प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. इराणमध्ये मोठ्या प्रमाणात यात्रेकरू येतात. त्यात काही जणांपासून हा संसर्ग पसरला असण्याची शक्यता आहे. आम्ही संख्येची खातरजमा करत आहोत.
बाधितांची आणि बाधा न झालेल्यांची तेथे चांगली सोय केली जाईल हे आमचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. इराणमध्ये 6000 भारतीय अडकले आहेत. त्यात 1100 यात्रेकरू लडाख आणि महाराष्ट्रातील आहेत. केरळ, तामिळनाडू आणि गुजरातमधील एक हजार मच्छिमार आहेत.