बिबवेवाडी (हर्षद कटारिया) –सॅलसबरी पार्क मुख्य रस्त्यालगत पदपथावरील स्वच्छतागृह दोन वर्षांपासून पत्रे लावून बंद ठेवण्यात आले आहे. यावर आता झाडे उगवली आहेत. पण, नेते आणि अधिकाऱ्यांना हा प्रकार दिसत नाही हे आश्चर्य मानावे लागेल अशी परिस्थिती आहे.
गिरीधरण भवन चौक ते सॅलसबरी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर हे एकमेव स्वच्छतागृह आहे. पण, तेदेखील बंद असल्याने नागरिक रस्त्यावरच आडोसा शोधतात. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक, रिक्षाचालक, कामानिमित्त येणाऱ्यांची यातून गैरसोय होत आहे. या स्वच्छतागृहाच्या पाइपलाइनचे काम रखडले असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.
दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या विकासप्रकल्पांकडे लक्ष पुरवणाऱ्या पालिकेला या स्वच्छतागृहाचा विसर पडावा, हे नवलच आहे. दरम्यान, या स्वच्छतागृहाच्या पाइपलाइनचे काम करण्यास बजेट उपलब्ध करून त्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती क्षेत्रीय कार्यालय अधिकाऱ्यांनी दिली.
सदर स्वच्छतागृह आठ वर्षांपासून सुरू होते. मात्र, पाइपलाइनची तांत्रिक अडचण असल्याचे संबंधित अभियंत्याने हे स्वच्छतागृह बंद ठेवले आहे. पाइपलाइन स्लोपच्या अडचणीबाबत संबंधित अभियंताच योग्य माहिती देऊ शकतील.
– विक्रम काथवडे, आरोग्य प्रमुख, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय.
शहरात अशा कामातून प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. लाखो रुपये खर्च करून स्वच्छतागृह बांधतानाच पाइपलाइनचे काम योग्य पद्धतीने होणे गरजेचे होते. शहरात अनेक जागी सुशोभीकरणापेक्षा नियोजनयुक्त मूलभूत कामे गरजेची आहेत. सदर स्वच्छतागृह सुरू होण्यासाठी तातडीने काम सुरू करावे, अशी आम्ही मागणी करतो.
– साईनाथ बाबर, नगरसेवक, मनसे
गेले दोन वर्षांपासून हे स्वच्छतागृह पत्रे मारुन बंद करण्यात आले आहे. महापालिकेच्या बजेटमधून ही सुविधा उभारण्यात आली होती. यावर एका नेत्याने संकल्पना म्हणून आपले नाव लिहिले होते. आता स्वच्छतागृहावर पिंपळाचे झाड उगवले आहे. संकल्पना व सौजन्य सगळेच वेशीवर टांगले आहे.
– एकनाथ ढोले, शिवसेना