बंगळुरु : प्रो कबड्डी लीगचा 8वा हंगाम सध्या बंगळुरूमध्ये मोठ्या थाटात सुरू आहे. आतापर्यंत सर्व संघांनी 7-7 सामने खेळले आहेत. एकीकडे गतवर्षी अंतिम फेरीतील दबंग दिल्ली हा एकमेव संघ आहे ज्यांनी एकही सामना गमावलेला नाही, तर दुसरीकडे तेलुगू टायटन्सला एकही विजय प्राप्त करता आला नाही.
दबंग दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल, तर तेलगू टायटन्सचा संघ तळाला आहे. नवीन कुमार, अर्जुन देशवाल, रिंकू, सुरजित सिंग, मनिंदर सिंग, पवन सेहरावत या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना खूप प्रभावित केले आहे.
असे असले तरी दिग्गज म्हणून ओळख असलेले परदीप नरवाल, श्रीकांत जाधव, के प्रपंजन, सुनील कुमार, अमित हुडा, धर्मराज चेरलाथन, नितेश कुमार या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही.
या लेखातून, यंदाच्या प्रो कबड्डी लीगमध्ये निराशाजनक कामगिरी करणार्या 3 दिग्गज रेडर्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे आतपर्यंत 10 गुणही मिळवू शकले नाहीत.
1) रोहित कुमार, तेलुगू टायटन्स (5 सामन्यांत 4 गुण)
प्रो कबड्डी लीगच्या 8व्या हंगामात तेलुगू टायटन्सने रोहित कुमारला आपल्या संघात समाविष्ठ करत संघाचे कर्णधारपद दिले होते. एकीकडे तेलुगू टायटन्सची आतापर्यंतची कामगिरी खूपच खराब झाली आहे आणि दुसरीकडे रोहित कुमारही वाईटरित्या फ्लॉप झाला आहे. रोहित कुमारने यंदाच्या हंगामात 5 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फक्त 4 रेड गुण मिळवले आहेत.
दरम्यान, रोहित कुमारने आपल्या संघासाठी 24 रेड केल्या आहेत, ज्यात त्याच्या नावावर 4 गुण आहेत. या सामन्यांपैकी 2 सामने असे होते ज्यात रोहित कुमारला एकही गुण मिळवता आला नाही.
रोहित कुमारच्या या निराशाजनक कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाने त्याला गेल्या दोन सामन्यांपासून संघाबाहेर ठेवले आहे. तेलुगू टायटन्स गुणतालिकेत तळाला असून एकही सामना जिंकलेला नाही. रोहित कुमारचा खराब फॉर्म हे त्याचे प्रमुख कारण आहे.
2) अजय ठाकूर, दबंग दिल्ली (4 सामन्यांत एक गुण)
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू अजय ठाकूरने संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत आणि तो या लीगमधीलच नव्हे तर जगातील सर्वात शक्तिशाली रेडर्सपैकी एक आहे. असे असले तरी, अजय ठाकूरला पीकेएल 8 मध्ये मात्र आपली छाप पाडता आलेली नाही.
दबंग दिल्लीचा मुख्य रेडर नवीन कुमार आहे आणि त्यानेच आपल्या संघासाठी अधिकाधिक रेड्स केल्या आहेत. त्यामुळे अजय ठाकूरला रेड्सच्या फारशा संधी मिळालेल्या नाहीत आणि मिळालेल्या संधींमध्ये त्याने विशेष काही केले नाही.
अजय ठाकूरने पीकेएल 8 मध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला 7 रेड्स करण्याची संधी मिळाली आणि त्याला फक्त एक गुण मिळवता आला आहे. दरम्यान, असे तीन सामने झाले आहेत ज्यात त्याला एकही रेड गुण मिळाला नाही.
3) राहुल चौधरी, पुणेरी पलटण (4 सामन्यांत 9 गुण)
राहुल चौधरी हा प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक रेड गुण मिळवणारा खेळाडू आहे आणि त्याला पुणेरी पलटणने 8व्या हंगामासाठी आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले आहे. पुणेरी पलटणला या दिग्गज खेळाडूकडून खूप आशा होत्या, पण राहुल चौधरी आतापर्यंत पीकेएल 8 मध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
राहुल चौधरीने पीकेएल 8 मध्ये आतापर्यंत 25 रेड्स केल्या आहेत, ज्यामध्ये त्याला केवळ 9 गुण मिळवण्यात यश आले आहे. याशिवाय, तो कोणत्याही सामन्यात संपूर्ण 40 मिनिटे सामन्याचा भाग नव्हता, प्रशिक्षक अनूप कुमार सतत बदली करत होते. राहुल चौधरीला गेल्या 3 सामन्यांत संघात स्थान मिळालेले नाही. नितीन तोमरच्या अनुपस्थितीत राहुलकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्याने निराशा केली. आगामी सामन्यांमध्ये राहुल चौधरीला संधी मिळाली तर त्याला नक्कीच आपला दर्जा दाखवावासा वाटेल.