पिंपरी – राज्यातील मुंबई महापालिका वगळता सर्वच महापालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये तीन सदस्यीय प्रभागरचेनुसार निवडणुका घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
या तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा कोणाला फायदा व कोणाला तोटा याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे. मात्र गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्या अपक्ष उमेदवारांना ही पद्धत डोकेदुखी ठरणार असल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष कामाला लागले आहे. त्यासाठी उमेदवारांची चाचपणीही सुरू केली होती. इच्छुक उमदेवारांनी मागील वर्षीपासून लसीकरण, आरोग्य शिबिर, मास्क व सॅनिटायझरचे वाटप आदी स्वरूपाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला आहे.
तिकीट मिळाले नाही तरी अपक्ष निवडणूक लढविण्याची अनेकांनी तयारी केली होती. त्यामध्येच एक सदस्यीय पद्धतीने प्रभागचरना करण्याचा आदेश आल्याने या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
त्यादृष्टीने अनेकांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. प्रमुख पक्षांने तिकीट दिले नाही तर अपक्ष लढण्याची तयारी या उमेदवारांनी केली आहे. मात्र ऐनवेळी राज्य सरकारने तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याची घोषणा केली आहे.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत अपक्षांना फारसे स्थान नसणार आहे. तसेच एकाच वेळी जास्त मतदारांपर्यंत पोहचावे लागणार आहे. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या विचारात असलेल्या अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाण्याची
शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये बहुसदस्यीय पद्धतीचा भाजप व राष्ट्रवादी दोघांनाही फायदा होणार असल्याचा दावा त्या-त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांची उमेदवार निवडताना कसोटी लागणार आहे. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेत महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वतंत्र यावर देखील बहुतांश गणिते अवलंबून आहेत.
1992 साली अपक्षांनी विरोधक म्हणून भूमिका बजावली
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक अपक्ष नगरसेवक 1992 साली निवडून आले होते. त्यावेळी तब्बल 32 नगरसेवक अपक्ष म्हणून सभागृहात दाखल झाले होते. त्यावेळी अपक्ष नगरसेवकांनी विरोधकांची भूमिका बजावली होती. त्यावेळी 78 जागांवर निवडणूक झाली होती. त्यामध्ये कॉंग्रेसने 33 जागा मिळवल्या होत्या.
2002 मध्ये झाली होती तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक
पिंपरी चिंचवड महापालिकेची 2002 मध्ये तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक झाली होती. 2002 मध्ये 105 नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 व कॉंग्रेसचे 32 नगगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीकडे महापौरपद व कॉंग्रेसकडे उपमहापौरपद असा फॉर्म्युला होता.