नेवासा – नेवासा तालुक्यातील म्हसले येथे शुक्रवार (दि.28) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या वीजेच्या कडकडाटात वीज पडून दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे आहे की, शुक्रवारी सकाळी वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती. म्हसले गावात वीजेचा कडकडाट झालेला असतांना मक्तापूर पाटाच्या बाजूला असलेल्या म्हसले परिसरात साई राजेंद्र शिरसाठ (वय 10) या चिमुकल्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली.
या घटनेनंतर म्हसले गावावर शोककळा पसरली आहे. या चिमुकल्याचा मृत्युदेह नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला आहे.