उत्तर प्रदेशमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

जालोन: उत्तर प्रदेशातील जालोनमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जालोन येथे गांधी इंटर कॉलेजमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याचा प्रकार घटला. या घटनेनंतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. तसेच महात्मा गांधी यांचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा आणि समाजकंटकांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या प्रकरणी गांधी इंटर कॉलेजचे प्राचार्य रवी कुमार अग्रवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपण जेव्हा महाविद्यालयात पोहोचलो तेव्हा महात्मा गांधींच्या पुतळ्याचे शीर हे जमिनीवर पडल्याचे आढळले. यानंतर त्वरित याची माहिती महाविद्यालय प्रशासनाला दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

यानंतर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून अज्ञात समाजकंटकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून महात्मा गांधींचा पुतळाही नीट करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सतीश कुमार यांनी दिली.

दरम्यान, कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. त्यानंतर आता महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. रात्रीच्या अंधारात लपून महापुरूषांचा अपमान करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करून त्यांच्या महानतेचा एक अंशही तुम्ही कमी करू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.