लोणावळा, (वार्ताहर) – पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंच ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा स्मारकाचे अनावरण भाजे (ता. मावळ) गावात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येत्या मंगळवारी (दि. ९) करण्यात येणार आहे. लोकवर्गणीतून उभारण्यात आलेला हे स्मारक लोहगड, विसापूर किल्ला तसेच भाजे लेणी आणि त्याठिकाणी पावसात वाहणाऱ्या भाजे धबधब्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आकर्षण स्थळ ठरणार आहे.
ऐतिहासिक लोहगड आणि विसापूर या गिरीदुर्गांच्या तसेच कलाकृतीचा एक उत्कर्ष नमुना समजल्या जाणाऱ्या पुरातन अशा भाजे लेणीच्या पायथ्याशी असलेल्या भाजे गावात छत्रपतींचे पुतळा स्मारकाचे उभे रहाते आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी गावातील तरुण मुलांनी या स्मारक उभारणीच्या कामाचा संकल्प सोडला होता. त्यानंतर महाराजांच्या ५१ गडकिल्ल्यावरील माती आणि जल याठिकाणी आणून गावातील ५१ जोडप्यांच्या हस्ते या स्मारक उभारणीच्या कामाची पायाभरणी करण्यात आली होती.
तेव्हापासून सुरू असलेल्या प्रवासात या तरुणांची जिद्द, चिकाटी आणि भाजे ग्रामस्थांनी त्यांच्या जिद्दीला दिलेली भरपूर आणि पुरेपूर साथ यांचा एकत्रित परिपाक म्हणून तब्बल ३४ फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्मारक पूर्णत्वास जात आहे. जमिनीपासून १८ फूट उंच भव्य असा चौथरा आणि त्यावर १६ फूट उंच छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बघताच क्षणी डोळ्यात भरत आहे.
तब्बल ४० लाख रुपये खर्चून उभ्या राहिलेल्या या स्मारकाचे अनावरण येथील स्थानिक नागरिकांच्या हस्तेच करण्यात येणार आहे. तत्पूर्वी याठिकाणी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत भाजे गावातील तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहे. शिवाय अनावरण सोहळ्यानंतर याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.
म्हणून दक्षिणमुखी पुतळा
महाराज सुरतेची लूट घेऊन रायगड किल्ल्यावर निघाले असता ती लूट लोहगड किल्ल्यावर लक्ष्मी कोठीमध्ये ठेवण्यात आली होती. ही लूट महाराज उत्तरेकडून दक्षिणेकडे घेऊन आले होते. शिवाय राज्याभिषेक नंतर महाराजांनी रायगडावरून दक्षिण दिग्विजयासाठी दक्षिणेकडे प्रयाण केले होते.
त्याची आठवण म्हणून महाराजांचा पुतळा देखील दक्षिणाभिमुख बसवण्यात आल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. शिवाय पुढील दोन महिन्यात याठिकाणी 100 फूट उंच ध्वजस्तंभ उभा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.