नवी दिल्ली: भारतीय पंतप्रधान आणि अन्य अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी भारताने बोईंग कंपनीकडे एका विशेष विमानाचे बुकिंग केले असून हे विमान सप्टेंबर महिन्यात एअर इंडियाकडे सोपवले जाणार आहे.
अशा स्वरूपाच्या एकूण दोन विमानांची नोंदणी बोईंग कंपनीकडे करण्यात आली आहे. बी 777 जातीची ही विमाने असणार आहेत. वास्तविक ही आलिशान विमाने जुलै महिन्यातच मिळणार होती, पण करोना समस्येमुळे त्यात काहीसा विलंब झाल्यानंतर आता ही विमाने सप्टेंबरमध्ये भारताला मिळणार आहेत.
व्हीव्हीआयपींसाठीची ही दोन्ही विमाने भारतीय हवाईदलाकडे सुपुर्त केली जाणार असून त्यांच्याकडूनच ती चालवली जाणार आहेत. मात्र, त्यांची देखभाल एअर इंडियाच्या अभियंत्यांकडून केली जाणार आहे. सध्या पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे एअर इंडियाच्या बी 747 विमानांमधून प्रवास करतात. जेव्हा या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकडून ही विमाने वापरात नसतात तेव्हा त्याचा अन्य प्रवासी कामांसाठी एअर इंडियाकडून वापर केला जातो.
आता जी खास दोन विमाने विकत घेतली जात आहेत, त्यात हवाई क्षेपणास्त्र सिस्टीमही बसवण्यात आली असून या दोन्ही आलिशान विमानांना अन्यही अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मात्र, या विमानांच्या किमती आणि त्यातील सुविधांची माहिती मात्र बोईंग कंपनीने गुप्त ठेवली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने बोईंग कंपनीकडे हा तपशील मागितला होता पण कंपनीने त्याला प्रतिसाद दिलेला नाही.