शिरूर (प्रतिनिधी) -शहरातील सिद्धी पहाड, नगर परिषद सेंटर शाळा, नगर परिषद- पाबळ फाटा येथील मैदान, जिजामाता गार्डन, न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे मैदान, आदी ठिकाणी तळीरामांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळेस दारू पिऊन तेथेच बाटल्या फोडण्याचे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहेत. पोलीस प्रशासन, नगर परिषदेने रात्रीची गस्त घालण्याची गरज आहे.
शहरातील महत्त्वाचा मानला जाणारा सिद्धीचा पहाड याठिकाणी मोठ्या संख्येने वृद्ध, महिला, नागरिक सकाळी व सायंकाळी फिरणे व व्यायामासाठी येतात. परंतु याठिकाणी रात्री तळीराम दारू पिऊन रस्त्यांवर बाटल्या फोडत आहेत. त्यामुळे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. सिद्धेश्वर पहाड वनीकरण वृक्ष संवर्धन मित्र यांच्या वतीने लावलेली झाडे तोडली आहेत.
पाण्याची टाकीच्या पाइपची मोडतोड केली आहे. रयत शाळेचे मैदान व नगरपरिषद सेंटर शाळेमधील आवारात तळीरामांचा रात्रीस खेळ सुरू आहे. पाबळफाटा परिसरातील मैदानात प्रकार सुरू आहेत. जिजामाता गार्डनमध्ये शिस्तच राहिली नाही.
नगरसेवक संदीप गायकवाड म्हणाले की, शिरूर पोलीस व नगर परिषद यांनी संयुक्त पथक तयार तळीरामांवर कारवाई करण्याची गरज आहे. तरच तळीरामांना चाप बसणार आहे.