बेल्हे, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील बेल्हे शिवारातील एका शेतकर्याच्या उसाच्या फडात वन विभागाने दोन दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजर्यात रविवारी (दि. 24) पहाटे अंदाजे सात महिने वयाचा बिबट्याचा बछडा अडकला. बेल्हे परिसरात 2023-24 या वर्षात पाळीव प्राण्यांकरिता काळ बनलेला बिबट्या अखेर पिंजर्यात अडकला असून यावर्षीचा तो पिंजर्यात अडकलेला सातवा बिबट्या आहे.
बेल्हे येथे पिंजर्यात अडकलेल्या बिबट्याला वनविभागाच्या कर्मचार्यांनी माणिकडोह बिबट्या निवारा प्रकल्पात सोडले असल्याचे वनपरीक्षेत्राचे अधिकारी वैभव काकडे यांनी सांगितले. बेल्हे परिसरात शिंदेमळा, हौदबाग शिवारात गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्याचा वावर असून बिबट्याने पाळीव प्राण्यांना सावज बनवण्याच्या प्रयत्न झाले.
त्यात अनेक जनावरे मृत झाली आहेत. हौदबाग येथील हरकचंद बोरा यांच्या मालकीच्या उसाच्या फडात दोन दिवसांपूर्वी वनकर्मचार्यांनी पिंजरा लावला होता. या पिंजर्यात बिबट्या अडकला. वनकर्मचार्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तो पिंजरा टेम्पोत टाकून माणिकडोह बिबट्या निवारा प्रकल्पात हलवण्यात आला.