पुणे – निसर्गाच्या सहवासाची गरज भासली की, साधारणपणे आपण जंगलांकडे धाव घेतो. मात्र पुणे महानगर व पुणे जिल्ह्यातील अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथला निसर्ग, जैवविविधता, वन्यजीव प्राण्यांचे दर्शन तुम्हाला हवेहवेसे वाटेल, तुम्ही तिथे आनंदाने रमू शकाल अशा काही ठिकाणांची माहिती व जाणीव करून देणारी विनोद बारटक्के दिग्दर्शित वाइल्ड वाइल्ड – पुणे या लघुपटाच्या मालिकेतील पहिल्या लघुपटाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी शरद पवार यांच्यासाठी पहिल्या लघुपटाचे स्क्रिनिंग देखील आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मगरपट्टा सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, जागतिक बँकेच्या पर्यावरण व सामाजिक मानांकन विभागाचे संचालक मनिंदरसिंग गिल, अनुज खरे, संजय देशपांडे, जंगल बेल्स या संस्थेच्या हेमांगी वर्तक आणि आरती कर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापुढेही मगरपट्टा सिटी ग्रुप आणि जंगल बेल्स यांनी मिळून वन संवर्धन व आणि जनजागृतीचे कार्य करत राहावे असे आवाहन श्री. पवार यांनी यावेळी केले.
पुणे महानगर व जिल्हाभरात धरण क्षेत्र, गवताळ, झुडुपी क्षेत्र व गर्द हिरवाईने व्यापलेल्या भागात जैवविविधता, वन्यजीव प्राण्यांचा लक्षणीय अधिवास आहे. या भागांमध्ये दुर्मिळ प्रजीतींची फुलपाखरे, वनस्पती, फ्लेमिंगो, ग्रे हेरॉन, ग्रेटर पेंटेंड स्नाईप, रेड मुनिया, रेन क्विल, शिकरा या व प्रजातींचे मनमोहक पक्षांसह बिबट्या, चिंकारा, हरीण, सांबर, कोल्हे अशा असंख्य वन्यजीव प्राण्यांचा समावेश व अधिवास असणारी निसर्गसंपन्नता आहे.
निसर्गाच्या या वरदानाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला शहरी वातावरणापासून फार दूर जाण्याची गरज नाही याची आठवण करून देण्यासोबतच आपल्या सभोवतालच्या वस्ती व लोकांमध्ये यासंबंधाने जागरूकता वाढण्यास मदत होईल या उद्देशाने हेमांगी वर्तक आणि आरती कर्वे यांच्या नेतृत्वातील जंगल बेल्स या संस्थेने दिग्दर्शक विनोद बारटक्के यांच्या दिग्दर्शनाखाली हा लघुपटाची निर्मिती केली आहे.
निसर्गासोबत जैवविविधता व वन्यजीव प्राण्याचे संरक्षण व संवर्धनाची गरज लक्षात घेवून मगरपट्टासिटी ग्रुपने या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. या लघुपटाच्या निर्मितीसाठी श्री. अनुज खरे, श्री. संजय देशपांडे यांची मोलाची मदत लाभली आहे. या लुघचित्रपटात उजनी धरण, बारामती व सासवड परिसरातील गवताळ प्रदेश, सिंहगड खोरे आणि ताम्हिणी घाट यासारखी भागातील जैवविविधता, वन्यजीव प्राण्यांचा अधिवास दाखवण्यात आला असून हा लघुपट https://youtu.be/5t6qoXcH170 या लिंकवर उपलब्ध आहे.