नवी दिल्ली – 15 ते 18 या किशोरवयीन गटातील मुलांना लसीकरण सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत 12 लाख 30 हजारहून अधिक जणांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मंडवीय यांनी राममनोहर लोहीया रुग्णालयात सोमवारी भेट देऊन लसीकरण कार्यक्रमाची पाहणी केली. त्यांनी काही लाभार्थ्यांशी संवाद साधला.
कोविन पोर्टलवर सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 39 लाख 88 हजार लाभार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली होती. त्यातील 12 लाख 30 हजार लाभार्थ्यांना तीन वाजेपर्यंत लसीची मात्रा मिळाल्याचे या पोर्टलवरील आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. करोनाच्या नव्या ओमायक्रॉन आवृत्तीच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर किशोरवयीनांचे लसीकरण सुरू करण्यात आले.
प्रौढांचे लसीकरण सुरू असणाऱ्या ठिकाणी या किशोरवयीन गटासाठी स्वतंत्र कक्ष अथवा रांगा तयार करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले होते. त्यांच्यासाठी लसीकरणाचे पथकही स्वतंत्र ठेवण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या.
राज्याच्या आरोग्य मंत्र्यांशी बोलताना सोमवारी मंडवीय म्हणाले, लसीकरण कार्यक्रम, लसीकरण पथक, आणि सत्र तसेच गट यांची खातरजमा करून घ्यावी. 15 ते 18 वयोगटासाठी केवळ कोव्हॅक्सिन हीच लस देण्यात येणार आहे. 2007 मध्ये किंवा त्याआधी जन्मलेल्या सर्व जण लस घेण्यास पात्र आहेत.