नाशिक – शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले आहे. फसवणूकीच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
अद्वय हिरे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते आहेत.
त्यांनी नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते भाजपमध्ये होते. मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून हिरे यांची ओळख आहे.
काय आहे प्रकरण?
अद्वय हिरे यांनी रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ती रक्कम 30 कोटींच्यावर गेली होती. त्यामुळे हिरे यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्वय हिरे यांनी याप्रकरणी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावर्षी एप्रिल महिन्यात अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेची दिशाभूल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
याप्रकरणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन आयेशा नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. बँकेची ही केस सुमारे आठ वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 31 कोटी 40 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसह 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंत्रमाग प्रकल्पासाठी बोगस दस्तऐवज दाखवून कर्ज उलल्याचा आरोप आहे.