पालघर हत्याप्रकरणी सीआयडीची दोन आरोपपत्रे

पालघर: पालघर सामूहिक हत्याप्रकरणी राज्याच्या सीआयडीने 126 जणांविरोधात दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या या घटनेमध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने केलेल्या मारहाणीत हत्या करण्यात आली होती.

याप्रकरणी राज्याच्या “सीआयडी’ने 4,955 आणि 5,925 पानांची दोन आरोपपत्रे बुधवारी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केली. याप्रकरणी सबळ पुरावा मिळवण्यासाठी “सीआयडी’ने 808 संशयित आणि 118 साक्षीदार तपासले. तर 154 जणांना अटक करण्यात आली तर 11 अल्पवयीनांनाही ताब्यात घेण्यात आले.

यापैकी कोणाही आरोपीला अद्याप जामिनावर सोडण्यात आलेले नाही, असे “सीआयडी’च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तपास अधिकारी असलेले “सीआयडी’चे उपाधिक्षक विजय पवार यांनी 126 आरोपींच्या विरोधातील ही आरोपपत्रे दाखल केली.

या आरोपींवर भारतीय दंडसंहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथ रोग प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.त्यांच्यावर हत्या, सशस्त्र दंगल आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणण्यासारख्या अन्य काही गुन्ह्यांचे आरोप आहेत.

या प्रकरणातील दोन अल्पवयीनांविरोधात पुरेसे पुरावे असल्याने त्यांच्याविरोधात बालन्यायालयामध्ये स्वतंत्र खटले चालवले जाणार आहेत, असे “सीआयडी’ने म्हटले आहे. या संदर्भातील अधिक तपास सुरू आहे. कागदपत्रांची छाननी पूर्ण झाल्यावर आरोपींवरील आरोप निश्‍चिती केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.