नवी दिल्ली – अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशभर विविध राज्यांत भाजपामध्ये इनकमिंग वाढले आहे. एका ताज्या घडामोडीत गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील खंभातचे काँग्रेसचे माजी आमदार चिराग पटेल यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात (bjp) प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.
चिराग पटेल पहिल्यांदाच आणंद जिल्ह्यातील खंभात मतदारसंघातून आमदार झाले होते. गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी त्यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीबद्दल निराशा व्यक्त केली होती आणि पक्षाच्या राज्य युनिटमध्ये गटबाजी होत असल्याचा आरोप केला होता.
डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पटेल यांनी भाजपच्या मयूर रावल यांचा चार हजारांच्या कमी फरकाने पराभव केला होता. गुजरात भाजपचे प्रमुख आणि खासदार सीआर पाटील यांनी चिरागची पक्षात परिचय करून दिला. यावेळी पाटील यांनी चिराग हे खंभातच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार असल्याचे संकेत दिले. त्यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झालेली आहे.
शनिवारी आणंद जिल्ह्यात बोरसद विधानसभा मतदारसंघातील सरपंच आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांसह सुमारे अडीच हजार काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.