छत्रपती संभाजीनगर – घाटीसह शासकीय रुग्णालयात रुग्ण सेवेची अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या नशिबी नेहमीच विविध समस्या येत आहे. दोन-दोन महिने या डॉक्टरांना विद्या वेतना शिवाय राहावे लागत आहे. प्रत्येक महिन्याला विद्या वेतनासाठी निवेदन द्यावे लागत आहे. यांसह अनेक मागण्या प्रलंबित असल्याने निवासी डॉक्टरांकडून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. घाटीच्या निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डकडून देखील संपात सहभागी असल्याचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. हा संप सात फेब्रुवारीपासून पुकारण्यात येणार असल्याने रुग्ण सेवा पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
मार्ड संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टरांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. गेल्या एक वर्षभरात मध्यवर्ती मार्ड संघटनने अनेकवेळा यासाठी सरकारकडे पाठपुरवठा केला. आंदोलन केली पण प्रत्येकवेळी आश्वासनांचे गाजर हे प्रशासनाकडून दाखवण्यात आले. प्रत्यक्षात कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
निवासी डॉक्टरांना दिले जाणारे त्यांचे हक्काचे विद्यावेतन हे त्यांना कधीही वेळेवर देण्यात येत नाही. अनेक महिन्यांसाठी विद्यावेतन थकीत असल्यामुळे निवासी डॉक्टरांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेल्स उपलब्ध नाही. त्यामुळे दोन-तीन डॉक्टरांना एकाच खोलीत अत्यंत अडचणीत राहावे लागत आहे.
या आहेत डॉक्टरांच्या मागण्या
निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे
निवासी डॉक्टरांसाठी सर्व सुविधा युक्त हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.
विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.