वाघोली, (प्रतिनिधी)- मुंबई ते यवतमाळ या मार्गावरील खाजगी ट्रॅव्हल्स बसला पुणे-नगर रोडवर वाघोलीत गुरुवारी (दि. 15) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीत बस जळून खाक झाली. सुदैवाने यामधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाणक्य ट्रॅव्हल्सची मुंबई ते पुसद बस पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथे गरम झाल्याने मागील बाजूने बस पेटल्याचे चालकाला दिसले. त्यांनी तात्काळ बस शेल पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला लावून प्रवाशांना खाली उतरवले. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. तात्काळ अग्निशमन दलाला कळविण्यात आले.
वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाचे जवान ओम पाटील, नितीन माने, प्रशांत अडसूळ, उमेश फाळके, रिजवान फरास, मयूर गोसावी, अभिजीत दराडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली.