संगमनेर/ घारगाव – संगमनेर तालुक्यात साकुर येथील साकूर- मांडवा रस्त्यावरील भगवान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आलेल्या अज्ञात तीन चोरट्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवून दिवसभरात जमा झालेले दोन लाख 50 हजार 747 रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात वाढत्या चोऱ्या, घरफोड्या, दरोड्यामुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
भगवान पेट्रोल पंपावर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले तीन अज्ञात चोरटे मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाण्यावरून पंपावर आले. त्यावेळी पंपावरील कर्मचारी विलास भाऊसाहेब कातोरे हा पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे जात असताना ते तिघे केबिनमध्ये घुसले आणि केबिनमध्ये पैसे मोजत असणारा कर्मचारी सुनील गीरे यास एकाने पिस्तूलाचा धाक दाखवत तुझ्याकडे असणारे सर्व पैसे आम्हाला दे नाही, तर गोळी घालून मारून टाकण्याची धमकी दिली.
तर दुसऱ्याने त्याच्या हातातील पैसे हिसकावून घेतले, तर तिसऱ्याने ड्राव्हरमध्ये असलेली काळ्या रंगाची बॅग काढून त्यातील पैसे काढून घेतले आणि मांडवे गावच्या दिशेने पळून गेले. पंपावरील कर्मचारी चोर चोर असे मोठ्याने ओरडल्यामुळे आसपासचे नागरिक पंपाकडे धावले, तर गिरे यांनी या घटनेची माहिती पंपाचे मालक आदिक खेमनर आणि व्यवस्थापक दत्ता शेंडगे यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुनील गीरे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या पेट्रोल पंपांवर चोरी करण्यापूर्वी या चोरट्यांनी घारगाव बसस्थानकाजवळ असणाऱ्या लक्ष्मी टायर वर्क्स या दुकानाचे मालक अनुदेव अनंत ओटुशेरी यांच्या दुकानात घुसून त्यांच्या खिशातून रोकड, दोन मोबाईल व त्यांची मोटारसायकल ( क्र. एम. एच. 17 सी ए 7207) पळवून नेली. या चोरीला विरोध केल्याने चोरट्यांनी या दुकान मालकावर चाकूने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. याच मोटारसायकलचा वापर पुढे साकुर येथील पेट्रोल पंपावर करण्यात आला. एकाच वेळी या चोरट्यांनी दोन ठिकाणी चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.
पोलिसांच्या भूमिकेमुळे नागरिकांचा संताप
संगमनेरच्या पठार भागात चोरी, दरोड्याच्या अनेक घटना घडल्या असताना यातील एकाही गुन्ह्याचा तपास लावण्यात घारगाव व संगमनेर पोलीस अपयशी ठरले आहे. पुणे पोलीस पठार भागात येऊन चोर,दरोडेखोरांच्या मुसक्या आवळीत असले तरी येथील पोलीस मात्र हातावर हात धरून बसले आहे.पोलिसांच्या या भुमिकेमुळे येथील नागरिक मात्र पुरते हादरून गेले आहे.