पुणे – नोंदणी व मुद्रांक विभागाने भाडेकरारच्या संगणक प्रणालीमध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार लिव्ह ऍन्ड लायसेन्स 2.0 ही नवीन प्रणाली आणली आहे. पुढील महिनाभरात संपूर्ण राज्यात या प्रणालीचा वापर करून भाडेकराराची नोंदणी होणार आहे. या प्रणालीमुळे दस्त नोंदणी वेगाने होणार आहे. पेमेंट करणे सोपे होणार आहे. याचसह ही प्रणाली पोलीस विभागाच्या “सीसीटीएनएस’ या प्रणाली सोबत लिंक केल्याने भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जाऊन देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे.
भाडेकरु नियंत्रण कायदा 1999 च्या कलम 5 नुसार भाडेकरारच्या दस्ताची नोंदणी करणे अनिवार्य आहे. राज्यात दरवर्षी सुमारे 10 लाखांपेक्षा जास्त भाडेकराराची नोंदणी होते. सध्याच्या प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे भाडेकराराच्या दस्ताची नोंदणी करण्यास वेळ लागत होता. तसेच दुय्यम निबंधक यांच्याकडे हे दस्त गेल्यानंतर त्यांच्याकडून मंजूर होण्यास विलंब होत होता. त्यामुळे मंजुरीअभावी दस्त प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढत होते.
यामुळे नागरिकांना वेळेत भाडेकरार नोंदवल्याचा दस्त मिळत नव्हता. लिव्ह ऍन्ड लायसेन्स 1.9 ही प्रणाली सध्या कार्यरत होती. ती प्रणाली जुनी झाल्याने नोंदणी व मुद्रांक विभागाने लिव्ह ऍन्ड लायसेन्स 2.0 ही प्रणाली विकसित केली आहे. राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) मदतीने ही प्रणाली तयार केली आहे. ही प्रणाली सध्यातरी फक्त अभिप्राय जाणून घेण्यासाठी उपलब्ध केलेली आहे. त्यामुळे या प्रणालीवर दस्त नोंदणी होणार नाही. यादरम्यान प्रत्यक्ष दस्त नोंदवण्यासाठी लिव्ह ऍन्ड लायसेन्स 1.9 ही प्रणाली सुरू राहणार आहे.
दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात ही प्रणाली लागू होईल, असा विश्वास नोंदणी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या नव्या यंत्रणेमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच पोलीस ठाण्यात माहिती देण्याचा त्रासदेखील कायमचा थांबणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन प्रणालीची वैशिष्ट्ये
- आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित
- पेमेंट करणे सुलभ
- दुय्यम निबंधक यांना वेगवान पद्धतीने दस्त नोंदणी करता येणे शक्य
जुन्या यंत्रणेतील त्रुटी
- भाडेकरार दस्त
- नोंदणी करण्यास वेळ लागत होता.
- दुय्यम निबंधकाकडून पुढील कार्यवाहीस उशीर
- दस्त प्रलंबित राहणे वाढले3
भाडेकरारासाठी नवीन प्रणाली आणली आहे. वापरकर्त्यांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी दि.28 ऑक्टोबरपर्यंत https:\\igrmaharashtara.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या प्रणालीचा वापर करून त्याचा अभिप्राय feedback.leavenlicense2@gmail.com यावर पाठवावा. – अभिषेक देशमुख, उपमहानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक विभाग