अत्यल्प दरामुळे उत्पादन खर्चही निघाला नाही : शेतकरी हतबल
वाल्हे – साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा दसरा आणि झेंडूची फुले यांचे नाते पूर्वापार चालत आलेले आहे. खंडेनवमी आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर वाल्हे, दौंडज परिसरामध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याने सोमवारी (दि. 23) पाहावयास मिळाले. झेंडूला प्रति किलोला फक्त 40 ते 50 रुपये असा दर मिळत होता.
पुरंदर तालुक्यातील झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, यावर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने तसेच पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत ऐन पावसाळ्यात टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अद्यापपर्यंत सुरूच असल्याने यावर्षी मागील वर्षापेक्षा तब्बल 139 हेक्टर क्षेत्रात झेंडूची लागवड घटली आहे.
ऐन सणासुदीच्या काळात पुरंदर तालुक्यात झेंडूचे उत्पादन अतिअल्प प्रमाणात हाती येणार असल्याने यावर्षी दसरा, दिवाळी आदी मोठ्या सणांच्या वेळी झेंडूच्या फुलांचे दर वाढण्याची आशा फूल उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र, झेंडूंच्या फुलांना अतिअल्प बाजारभाव मिळत असल्याने झेंडू पिकाला केलेला खर्च देखील या पैशांतून भागणार नसल्याचे, झेंडू उत्पादक दौंडज येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्येही खंडेनवमीसाठी झेंडूच्या फुलांना दरवर्षीच मोठी मागणी असते. मात्र, यावर्षी झेंडूचे उत्पादन अतिअल्प प्रमाणावर असूनही, दरवर्षी प्रमाणे यावर्षी झेंडूच्या फुलांना मागणी नसल्यामुळे, चांगला बाजारभाव मिळत नसल्याची खंत शेतकरीवर्गामधून व्यक्त होत आहे.
मध्यंतरी झालेल्या पावसामुळे झेंडूच्या प्रतवारीवर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांनी. यंदा दसऱ्याला झेंडू फुलांची मोठी आवक झाली. चांगल्या प्रतीच्या झेंडूला हवा तसा भाव मिळाला नाही तर पावसामुळे खराब झालेल्या झेंडूला दरच मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले