पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – किरकोळ बाजारात उच्चांकी भाववाढ झालेल्या लसणाचे भाव आता हळूहळू उतरणीला लागले आहेत. सध्या लसणाचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. पंधरा दिवसांच्या तुलनेत मार्केट यार्डात लसणाची आवक दुपटीहून अधिक वाढली आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात लसणाच्या भावातील तेजी कमी झाली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात शंभर रुपये पावशेर म्हणजेच ४०० रुपये किलो भावाने विक्री होणाऱ्या लसणाची आता ५० रुपये पावशेर भावाने विक्री होत आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. लसणाचे भाव मागील तीन ते चार महिन्यांपासून तेजीत होते. त्यामुळे स्वयंपाक घरात लसणाचा वापर कमी प्रमाणात करण्यात येत होता. मात्र, आता मध्य प्रदेशातून लसणाची आवक सुरू झाली आहे.
दररोज येथील बाजारात सुमारे २० ते ३० टन आवक होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी ही आवक सुमारे १० टन होत होती. ही आवक अपुरी पडत असल्याने लसणाचे भाव तेजीत होते. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात प्रतवारीनुसार लसणाला किलोला २२० ते ३७० रुपये भाव मिळत होते. ते आता २०० रुपयापर्यंत घसरले आहेत.
लसणाचा नवीन हंगाम सूरू झाला आहे. आता पुढील तीन ते चार महिने लसणाची आवक मोठी राहणार आहे. भावात आणखी घसरण होण्याचा अंदाज आहे – विलास भुजबळ, ज्येष्ठ आडते, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड