पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – धानोरी येथील रहिवासी आणि सैन्य दलात लेह-लडाख येथे कर्तव्य बजावत असणारे ४२ वर्षीय सुभेदार अजित अशोक मोरे यांचे खराब हवा आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गुरुवारी (२२ फेब्रुवारी) लडाखमध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला.
वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी आजी-माजी सैनिक, मित्र परिवार, कोकण रहिवासी संघाचे प्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. फुलांच्या माळांनी सजवलेल्या शवपेटीवर तिरंगा आच्छादित करून सलामी देण्यात आली. त्यापूर्वी अंत्यदर्शनासाठी त्यांचा मृतदेह धानोरी आणि नंतर रामनगर येथे नेण्यात आला. येरवडा येथील अमरधाम स्मशानभूमी येथे त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोरे हे गेल्या दोन दशकांपासून लष्करी सेवेत कार्यरत होते. त्यांचे वडील अशोक मोरे हेही माजी सैनिक आहेत. मोरे यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ, बहीण आणि आजोबा असा परिवार आहे. अजित पूर्वी येरवड्यात रामनगर येथे वास्तव्यास होते. त्यांचे शालेय शिक्षण खडकी येथील लोकमान्य टिळक शाळेतून तर महाविद्यालयीन शिक्षण आलेगावकर महाविद्यालय आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय येथे झाले होते.
२००२ मध्ये बॉम्बे सॅपर्समध्ये लिपिक म्हणून रुजू झाले. धाडसी, मनमोकळ्या आणि हसतमुख स्वभावाने सदैव दुसऱ्यांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. २०११ मध्ये ते अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण होऊन कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले होते. सध्या ते लडाख येथे कार्यरत होते. मोरे हे मूळचे ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अस्तान तिसंगी या गावचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीमुळे धानोरी परिसरात व खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.