सातारा – खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील रहिवाशी व सध्या बिहारमधील पाटणा येथे वास्तव्यास असलेल्या अमोल जाधव यांच्या घरात गॅस गळतीने स्फोट झाला. यात जाधव यांच्या घरातील चौघे जखमी झाल्याने त्यांना पाटणा येथील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना पुणे किंवा मुंबईत हलविण्यास सांगितले. मात्र, त्याठिकाणावरून येण्यास जाधव यांना सोय होत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर आल्याने त्यांनी कुठलाही विचार न करता जाधव यांच्या कुंटुंबातील जखमींना स्वखर्चाने इमर्जन्सी एअरलिफ्टने पुण्याला आणले. मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवलेल्या या पालकत्वाची चर्चा सध्या राज्यभर असून त्यांच्या या संवेदनशीलतेला खटाव तालुक्यातील जनतेकडून सोशल माध्यमावर दाद दिली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरसाळे येथील अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी पाटणा येथे वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता त्यांच्या घरात गॅसगळतीने मोठा स्फोट होऊन कुटुंबातील चार लोक मोठ्या प्रमाणात भाजले. त्यांना तत्काळ खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना पुण्यात हलविण्यास सांगितल्याने जखमींना कसे न्यायचे हा प्रश्न जाधव यांच्यासमोर उभा होता. कुटुंब व नातेवाइक हतबल झाले.
हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा खर्च कोठून करणार, हा गंभीर प्रश्न पडल्याने जाधव यांनी खानापूर आटपाटीचे आ. अनिल बाबर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितात्काळ शासकीय एअर ऍम्बुलन्स मिळण्यासाठी विनंती केली.
परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय एअर ऍम्बुलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून दोन एअर ऍम्बुलन्सची सोय करून जाधव कुटुंबांतील जखमींना तातडीने पुण्यात आणण्याची सोय केली. पुणे विमानतळावर जाधव यांच्यासाठी बिहारवरून येणाऱ्या एअर ऍम्बुलन्सला प्राधान्याने लॅंडिंगची परवानगी देण्यात आली. त्यानंतर रविवारी दिवस उजाडण्याच्या आत जखमींना पुण्यात आणण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना दिले.
त्यानुसार जखमीपैकी 11 वर्षाच्या मुलास घेऊन रविवारी सकाळी सहा वाजता स्पेशल विमान पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर जखमींपैकी दुसऱ्या 12 वर्षाच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान सकाळी अकरा वाजता विमानतळावर दाखल झाले. दोन्ही जखमी रुग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या सहाय्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले असून येथे उपचार सुरू आहेत. शिंदे यांनी राज्याचा गाडा हाकत असताना व्यस्त वेळेतूनही सर्वसामान्य कुंटुंबासाठी एअर ऍम्बुलन्सची सोय करून त्यांचे दुखाचे ओझे हालके करण्यासाठी निभावलेल्या पालकत्वाच्या भूमिकेची सध्या राज्यभर चर्चा आहे. खटाव तालुक्यातील जनतेने त्यांचे विशेष आभार मानले.