कराड – शहरालगतच्या गजानन हौसिंग सोसायटीमधील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटीनच्या कांड्या लावून उडवून देण्याचा चोरट्यांचा प्रयत्न शहर पोलिसांनी उधळून लावला. यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी त्यांच्याकडील स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारल्याने तीन पोलीस जखमी झाले. याचा फायदा घेत तीन चोरटे पसार झाले. मात्र, एकाला पकडून ठेवण्यात जखमी पोलिसांना यश आले. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, चोरट्यांनी एटीम सेंटरमध्ये लावलेल्या जिलेटीन कांड्याचा पोलिसांनी दुपारी स्फोट घडवून त्या निकामी केल्या.
सचिन अशोकराव वाघमोडे (वय 38, रा. आदर्शनगर, काळेवाडी, पुणे. मूळ रा. परळी वैजनाथ, जि. बीड) असे पोलिसांनी पकडलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याच ठिकाणी एक होंडा ट्विस्टर मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गजानन हौसिंग सोसायटीत काही लोक एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती वायरलेसद्वारे कराड पोलिसांना मिळाली. वायरेलस कक्षातील महिला पोलिसाने प्रसंगावधान राखत हा प्रकार पेट्रोलिंग करत असलेल्या दामिनी पथकासह बीट मार्शल पथकास कळवला. पोलीस हवालदार जयसिंग राजगे, पाटील, सूर्यवंशी, गृहरक्षक दलाचे निकम तात्काळ गजानन हौसिंग सोसायटीत पोहोचले. त्यांना चार चोरटे एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न करताना दिसले. पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी पोलिसांशी झटापट सुरू केली. पोलिसांनी त्या चौघांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. एका चोरट्याने त्याच्या हातातील स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारला. त्यामुळे पोलीस जखमी झाले.
तरीही पोलिसांनी चोरट्यांना पकडून ठेवले. मात्र, पोलिसांच्या जखमी होण्याचा फायदा घेत तीन चोरटे तेथून पसार झाले. एका चोरट्यास पकडण्यास पोलिसांना यश आले. चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी जिलेटीन, पेट्रोल बॉम्ब सोबत आणले होते. जिलेटीन एका मशिनला लावलेल्या अवस्थेत होते. त्याचा नंतर स्फोट होऊ नये यासाठी ते जिलेटीन आज सकाळी पोलिस, बॉम्ब शोधक पथकाने सुरक्षितरित्या स्फोट घडवून आणत निकामी केले. तत्पूर्वी या एटीेएम सेंटरची इमारत रिकामी करण्यात आली. परिसरात बॅरिकिेंटग करण्यात आले. सर्व परिसर निर्मनुष्य करण्यात आला. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या उपस्थितीत बॉम्बशोधक व नाशक पथकाने एटीएम सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले जिलेटिनचे स्फोट केले.
यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरात खळबळ उडाली. अग्निशामक दलाला प्राचारण करण्यात आले होते. मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी कराड- ओगलेवाडी रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपअधीक्षक रणजीत पाटील, कराड शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, सरोजिनी पाटील, अमित बाबर यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी होता.
जिगरबाजांनादहा हजाराचे बक्षीस
एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असताना नेमके त्याच वेळी चोरटे आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. चोरट्यांनी पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारल्याने तीन पोलीस जखमी झाले. तरीही एका चोरट्यास पोलिसांनी पकडले. या पोलिसांनी दाखवलेल्या धाडसी कामगिरीची दखल घेत पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी हेड कॉन्स्टेबल जयसिंग राजगे, सचिन सूर्यवंशी, सपोनि तबस्सुम शादिबान, पोलिस चालक संग्राम पाटील, समीर काशीद, होमगार्ड सुशांत निकम यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस देउन सत्कार केला. त्यांना पोलिस दलाकडून रिवॉर्ड मिळावे यासाठी शिफारस करण्याचे पोलिस अधीक्षकांनी जाहीर केले.