भोर/कापूरहोळ (प्रतिनिधी) – शहरानंतर आता ग्रामीण भागात करोना आपले पाय पसरत आहे. भोर तालुक्यातील नरेमध्ये आढळले दोघे रुग्ण रविवारी (दि. 3) करोनामुक्त झाल्याने तालुका करोना मुक्त झाल्यात जमा होता. मात्र, नसरापुरात एक जण करोनाबाधित झाल्याचे शनिवारी (दि.2) रात्री निष्पन्न झाल्याने भोर तालुक्यासाठी रविवार “थोडा खुशी थोडा गम’चा ठरला आहे.
तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील नेरे येथील दोन रुग्णांना करोनाची लागण झाली होती. या दोघेही करोनामुक्त झाले आहेत. ते रविवारी (दि.3) नेरे गावी आल्यावर ग्रामस्थ व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. यामुळे आता विसगाव खोरे करोनामुक्त झाले आहे.
नेरे गावात मंगळवारी (दि.14 एप्रिल) तर शुक्रवारी (दि.17 एप्रिल) दुसरा रुग्ण करोनाबाधित आढळल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या दोघांवर पुण्यातील औंध येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर 14 दिवस यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या असून त्या चाचण्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
करोनामुक्त दोघांचे रविवारी दुपारी 2 वाजता नेरे गावी आगमन झाले, त्यावेळी ग्रामस्थ व प्रशासनाच्या वतीने त्यांचे झालेले स्वागत पाहून या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना आश्रू अनावार झाले होते. यावेळी या दोघांना अत्यावश्यक वस्तूंचे कीट प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी भोर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलीस निरिक्षक राजू मोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, डॉ. अमित शेठ, डॉ. मिलिंद जाधव, पोलीस जमादार प्रदीप नांदे, हवालदार सुभाष गिरे, अप्पा हेगडे, नेरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अंकुश सावले, गोविंद लाखे, जालिंदर तळेकर, किरण साळुंखे, तानाजी मैद, अनिल महांगरे, शाळा समितीचे अध्यक्ष संतोष म्हस्के, चंद्रकांत सावले, प्रकाश मैद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.