कापूरहोळ – भोर, वेल्हे तालुक्याला जोडणारी मुख्य बाजापेठ असलेल्या नसरापूरमध्ये करोनोग्रस्त रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. दोन्ही तालुके करोनामुक्त होण्याचा मार्गावर असताना नवीन रूग्ण आढळून आल्याने परिसरात धास्ती निर्माण झाली आहे.
नसरापूर येथील 38 वर्षीय व्यक्तीचा करोना अहवाल शनिवारी (दि. 2) रात्री प्राप्त झाला असून यात तो करोना पॉझिटिव्ह असल्याचे नमूद करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीचा छोटा व्यवसाय असला तरी लॉकडाऊननंतर तो कामावर गेलेला नाही. तरीही त्याला करोना झाल्यामुळे प्रशासनाने कारणे शोधण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम सुरू केली आहे. या रुग्णास पुण्यात उपचारासाठी दाखल केले आहे.
प्रशासनाने रात्रीपासूनच नसरापूरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. रविवारी प्रांतधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या आदेशाने संपूर्ण परिसर सील करण्यात आला. यावेळी तहसीलदार अजित पाटील, राजगड ठाण्याचे सहायक निरीक्षक दत्तात्रय दराडे, मंडधिकरी मड्डेपल्ली, तलाठी जे. के. बरकडे, ग्रामसेवक अभय निकम यांनी तातडीने कार्यवाही केली असून नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशानाने केले आहे.