प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 -गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो प्रकल्प पीएमआरडीए करत आहे. तर, यासाठी शिफ्ट करण्यात येणाऱ्या सेवा वाहिन्यांची काही कामे महामेट्रो आणि महापालिका करत आहेत. येथे मेट्रोचे बॅरिकेड्स आहेत. त्यावर येथील खड्डे आमची जबाबदारी नाही असे सांगत महापालिकेने पीएमआरडीए प्रशासनाकडे जबाबदारी टाकली. त्यामुळे त्यांनी डांबरीकरण केले. मात्र, हे काम तकलादू असल्याचे पावसामुळे समोर आले आहे. आता येथे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा याच रस्त्याने मंगळवारी नेण्यात आला.
गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोसाठी पीएमआरडीएने बॅरिकेडिंग केले आहे. पालिका सेवा वाहिन्या हटवत आहे. तर, एका ठिकाणी महावितरणची भूमिगत वीजवाहिनी महामेट्रो टाकत आहे. या कामांमुळे या मार्गावर खड्डे पडले होते. महापालिकेने ही जबाबदारी “पीएमआरडीए’वर ढकलली. त्यानंतर रस्ते दुरुस्ती करत पुन्हा खड्डे पडल्यास त्यांची दुरूस्ती करणार नाही, असे पत्र देत पीएमआरडीएने पालिकेस बजाविले होते. मात्र, पुन्हा येथे खड्डेच खड्डे चोहीकडे अशी स्थिती दिसून येत आहे. त्यामुळे आता निकृष्ट कामाची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.