कुनो – मध्यप्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून चित्ते आणून सोडले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कुनो राष्ट्रीय उद्यान चर्चेत आले आहे. येथील परिसरात खोदकाम करताना 200 वर्षांपूर्वीच्या नाण्यांचा खजिना सापडला आहे. उद्यानातील कामगार बांधकामासाठी खोदकाम करत होते. तेव्हा त्यांना तांबे आणि चांदीचे नाणे सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा नाण्यांचा खजिना पालपूर किल्लाच्या जवळ काही फूट जमिनीखाली होता. यापासून काही अंतरावरच चित्ते आहेत. ही नाणी खोदकाम करताना कामगारांना सापडली होती. कामगारांनी याची माहिती पुरातत्व अथवा वन विभागाला न देता ही नाणी आपापसात वाटून घेतली. यातील काही कामगार कामावर परतलेच नाही. त्यानंतर चर्चांना उधाण आले.
दरम्यान, कुनोला गीर सिंहांसाठी अभयारण्य घोषित केले होते. त्यापूर्वी ती जमीन पालपूर येथील राजघराण्याची होती. अभयारण्य घोषित केल्यानंतर जमीन आणि राजघरण्याचा किल्ला सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला होता. नाणे सापडल्याची माहिती मिळताच राजघराण्याचे वंशज आर. के. श्रीगोपाल सिंग पालपूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.