रांजणगाव गणपती – खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात बसमधील 38 प्रवासी जखमी झाले. जिवीतहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना पुणे – नगर महामार्गावर शुक्रवार (दि.21) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रवासी मंगलसिंग जयवंतसिंग ताजू (वय 30, मुंबई, मूळ रा. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमसफर ट्रॅंव्हल्स कंपनीची बस (दि.20) रोजी रात्री पावणेदहा वाजता 38 प्रवासी घेऊन पुण्यामार्गे औरंगाबादच्या दिशेने निघाली होती. पुणे-नगर महामार्गावर व्हर्लफुल कंपनीसमोर आली असता वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस पलटी झाली.
यात बसमधील प्रवासी जखमी झाले. यातील प्रवासी रांजणगाव, शिरुर, शिक्रापूर व पुणे या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, हा अपघात होताच बसमधील वाहनचालक फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी संतोष पवार हे करीत आहेत.