पुणे – शहरातील तब्बल चार हजार कुटुंबांतील एक नाते करोनाने हिरावून नेले. त्यामुळे या घरांनी दिवाळी सणाचा आनंद घेतला नाही. अशा कुटुंबीयांसह दिवाळी साजरी करताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी फराळ किटची अनोखी भेट घरपोच देण्यात आली. शिवाय यात भावनिक पत्र लिहून महापौर मोहोळ यांनी त्या कुटुंबीयांना आधार देण्याचाही प्रयत्न केलाय.
या उपक्रमाबद्दल महापौर म्हणाले, ‘दीपावलीचा पुरेपूर आनंद घेता येईल, असे हे वर्ष नाही. हे वर्ष यातना देणारे ठरले. करोनाच्या साथीत पुण्यात चार हजारांहून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याचा प्रथम नागरिक या नात्याने मीदेखील या खिन्नतेचा अनुभव घेतो आहे. दीपावलीचा हा उत्सव आपल्या परंपरेचा भाग आहे.
ही परंपरा त्या कुटुंबीयांनाही जपता यावी आणि दुःख मागे सारून त्यांना नव्याने आयुष्याची घडी बसवायला आपलाही आधार मिळावा, शिवाय ही घडी बसवतांना तुम्ही एकटे नाहीत, ही भावनाही त्यांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.’