मुंबई, दि. 14 -शेअरबाजारात आणि इतर क्षेत्रांत परकीय गुंतवणूक वाढत असल्यामुळे भारतीय परकीय गंगाजळी नव्या विक्रमी पातळीवर गेली आहे.सहा नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलनाचा साठा 568 अब्ज डॉलरवर गेला आहे.
या आठवड्यामध्ये परकीय चलन साठ्यात 7.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. भारतात महागाई वाढत असूनही आणि जागतिक व्यापार परिस्थितीत ठीक नसूनही भारतीय रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यास रिझर्व्ह बॅंकेला यश मिळाले आहे. त्यामुळे भारताकडील परकीय चलनाच्या मूल्यात वाढ होत असल्याचे दिसून येते.
परकीय चलनसाठ्यात रिझर्व्ह बॅंकेडील सोन्याचा साठ्याचा समावेश आहे. रिझर्व्ह बॅंकेकडे 37.5 अब्ज डॉलरचे सोने आहे. भारताबाबत परकीय गुंतवणूकदार आशावादी आहेत. त्यामुळे भारतात गुंतवणूक वाढत असल्यामुळे परकीय चलन साठा वाढत आहे.