भिवंडीत चार मजली इमारत कोसळली

दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी

मुंबई : भिवंडीत एक चार मजली इमारत कोसळली असून यात दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. शांतीनगर पिराणीपाडा जवळ ही घटना घडली आहे दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अजूनही काही लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

शांतीनगर परिसरातील पिरानीपाडा येथील ही इमारत रात्री अडीच वाजताच्या सुमारास कोसळली. या अगोदर रात्री 11 वाजता या इमारतीला तडे जाण्यास सुरूवात होत होती. याची माहिती इमारतीतील रहिवाशांनी पालिकेला दिली. त्यानुसार पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. परंतू, इमारतीमधील कुटूंबीयांना बाहेर काढतेवेळी अचानक ही इमारत कोसळली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अद्यापही बचावकार्य सुरू असून पाच जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. जखमींना भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.