पुणे – घर असावे घरासारखे… नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती.., असे म्हटले जात होते. परंतु, आता शहराचा झालेला विस्तार, इतर शहरांतून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण, लोकांचे सुधारलेले जिवनमान. कर्ज उपलब्ध होण्याचे चांगले पर्याय, यातून वन बीएचके मधून टु बीएचके असे घर घेताना त्याही पुढे जावून मोठ्या लग्झरी घराचा विचारही होऊ लागला आहे. यामुळेच अशा घरांची मागणी वाढत आहे.
सीबीआरईचा जानेवारी ते सप्टेंबर 2023 पर्यंतचा अहवाल (रिपोर्ट) आला आहे. यानुसार देशातील सात प्रमुख शहरांमध्ये चार कोटी किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या मोठ्या लग्झरी फ्लॅटची विक्री वाढली असल्याचे म्हटले आहे. महाग आणि लग्झरी घरांची मागणी 97 टक्के वाढली आहे.
हे आहे कारण…
मोठ्या लग्झरी घरांची विक्री वाढण्यामागे प्रमुख कारण उत्पन्न वाढीचे सांगितले जात आहे. यामुळे महानगरांमध्ये मोठ्या घरांना मागणी वाढली आहे. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत ही मागणी वाढली असताना ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्येही यात चांगली वाढ झाली आहे. विकासकांकडून आता केवळ घर नव्हे तर स्मार्ट होम बनवण्यास प्राधान्य दिले जात आहे. यात स्मार्ट स्विच आणि फोनच्या क्लिकवर प्रकाश तसेच अन्य लग्झरी सुविधांचा समावेश आहे.
दहा वर्षांचा उच्चांक…
सीबीआरई रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आर्थिक विकास, अनुकूल नियम आणि बदलती जीवनशैली यामुळे प्रीमियम आणि लग्झरी घरांची मागणी वाढली आहे. ही मागणी 2023 मध्ये गेल्या दहा वर्षांच्या उच्चांकावर होती. अनिवासी भारतीयांमध्ये लग्झरी घरांची लोकप्रियता वाढत आहे. आता, भारतीय रिअल इस्टेटचा लग्झरी होम महत्वाचा भाग झाले आहे.
पुणे शहराचा यादीत समावेश…
लग्झरी घरांची मागणी महानगरांमध्ये वाढली आहे. एकूण लग्झरी घरांची मागणीपैकी 90 टक्के मागणी दिल्ली एनसीआर, मुंबई आणि हैदराबाद या शहरांमध्ये आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये एकूण 37 टक्के ही मागणी होती. मुंबईत 35, हैदराबादमध्ये एकूण घरांच्या 18 टक्के मागणी होती. लग्झरी घरांच्या यादीत गेल्या वर्षी पुणे शहराची नोंद नव्हती मात्र यावर्षी पुणे शहरातही अशा घरांची मागणी 4 टक्के नोंदविली गेली असून यामध्ये वाढ होत आहे.
“गेली २५ वर्षे आम्ही बांधकाम व्यवसायिक म्हणून काम करीत असून नवीन गृहप्रकल्प उभारण्यापूर्वी नागरिकांना आवश्यक असलेल्या बाबींची पुर्तता करण्यावर भर असतो. आता, ग्राहकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यानुसार कामास आम्ही प्राधान्य देत असून गृहप्रकल्प उभारत असताना लग्झरी तसेच सदनिका मोठ्या ठेवण्यावर भर असतो. रेरा कायद्यामुळे विश्वासार्हता वाढल्याने अशा घरांसाठी मोठे पैसे मोजण्याची तयारी ग्राहक ठेवत आहे. पुण्याचा विकास पाहता अशा घरांचीच आता यापुढे अधिक मागणी वाढेल. असे असंख्य ग्राहक पुण्यात उपलब्ध होत आहेत.” – अरुण राजवाडे, बांधकाम व्यावसायिक, व्यंकटेश बिल्डकॉन प्रा. लि.
“पुणे शहराचा विस्तार आता मोठ्या प्रमाणात झाला आहे. केवळ पेठांपुरते शहर राहिले नाही. तसेच, आयटी पार्क, औद्योगिकरण या कारणातून शहरातील उलाढाल वाढलेली असताना सांस्कृतिक, शैक्षिणकी बाबींसह वातावरण या मुद्दयांवर पुणे शहरात घर घेण्याकडे उच्चमध्यमर्गीय तसेच श्रीमंतांचाही कल वाढला आहे. अशा ग्राहकांचा विचार करून शहर आणि परिसरात लग्झरी सोसायट्या उभ्या राहत आहेत. विशेष म्हणजे अशा घरांना मागणीही चांगली आहे. पुढील काळात अशा साइटस् आणखी वाढतील. बांधकाम उद्योगातील हा बदल असल्याचे मानले जात आहे.” – संतोष ताठे, बांधकाम व्यावसायिक, श्रुती डेव्हलपर्स